भगवान गौतम बुद्ध यांना मी मानतो. पण त्यांनी आपली पत्नी व लहान बाळ यांना सोडले हे योग्य आहे का?
उत्तर भारतात अशी काही राज्यें होती ज्यांच्यावर राजाची अधिसत्ता नव्हती, त्यातलेचं एक राज्य कपिलवस्तू चे शाक्य. अशा राज्यांना संघकिंवा गणराज्य असें म्हणतं.शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवीत. भगवान सिद्धार्थ गौतमयांच्या जन्माच्या वेळी वडील शुद्दोदन कपिलवस्तूचे राजा होते.
वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थ गौतमांच्या विद्याभ्यासास सुरवात झाली होती. याचं काळात दंडपाणी नावाचा एक शाक्य होता, त्याला यशोधरानावाची मुलगी होती. त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे मुलीच्या स्वयंवरा साठी शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रण दिले होते, सिद्धार्थ गौतम सोळा वर्षांचे झाले होते त्यांनाही हे निमंत्रण पाठवण्यात आले.
स्वयंवरच्या स्पर्धेत सिद्धार्थ गौतम विजयी झाले व त्यांचा विवाह पार पडला, विवाह होऊन काही वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव राहुल असें ठेवण्यात आले.
त्या काळात शाक्यांचा एक संघ होता, वयाची विस वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दिक्षा घ्यावी लागत व संघांचे सभासद व्हावे लागत असें. सिद्धार्थ गौतमांना विस वर्षे पूर्ण झाल्या नंतर त्यांनी नियम समजून घेत या संघात प्रवेश घेऊन सभासद बनले, ते संघांचे एकनिष्ठ व बाणेदार सभासद बनले होते व सर्वांचे प्रिय झाले होते.
प्रवेश घेऊन जवळ जवळ आठ वर्षे लोटली होती त्यानंतर एक घटना घडली.
शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते.रोहिणीनदीमुळे ही दोन्ही राज्यें विभागली गेली होती. या नदीचे पाणी दोन्ही राज्यें आपआपल्या शेतीकरिता वापरीत होते.पण प्रथम पाणी कोणी घ्यावे व किती घ्यावे याबद्दल सुगीच्या हंगामात वाद होत असें, व वादाची परिणीती भांडणात व कधी मारामारीत होत असें.
भगवान गौतम बुद्धांच्या वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी दोन्ही वर्गात मोठा संघर्ष निर्माण झाला, दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापत झाली.
हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकाली काढावा असें शाक्यांच्या सेनापतीला वाटले व युद्धाच्या निर्णयासाठी त्याने सभा बोलावली.
कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा त्याने ठराव मांडला व ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे असं सुचविले. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभे राहून त्यांनी या ठरावाला विरोध केला व म्हणाले
" युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही, युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही, त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील...." यावर बराच वेळ चर्चा झाली, उत्तर-प्रतिउत्तर झाले.
अस्वस्थ होऊन संघाच्या सेनापतीने प्रस्ताव मांडला की
" सिद्धार्थ गौतमाचा माझ्या युद्धाच्या प्रस्थावाला विरोध आहे, यासंबंधी संघांचे काय म्हणणे आहे याची खात्री करून घेऊ"
सेनापतीचा प्रस्ताव बहुमताने घोषित करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासाठी दुसरी सभा बोलावली.सिद्धार्थ गौतमांनी पाहिले की आपल्याला पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत, पण यावेळी सुद्धा सिद्धार्थ गौतमांनी विरोध दर्शवला.
सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले
" बहुमताने घेतलेल्या निर्णयाचे तु पालन करायला हवे. संघाची आज्ञा मोडणाऱ्याला शासन करण्यासाठी संघाकडे अनेक मार्ग आहेत, संघ तूझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल, तूझ्या कुटुंबाची जमीन जप्त करून शकेल."
कोलियांशी युद्ध करण्याच्या योजनेला विरोध करीत राहिल्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची जाणीव सिद्धार्थ गौतमांना झाली, त्यांच्या पुढे तीन पर्याय उभे राहिले.
1. सैन्यात दाखल होऊन युद्धात सहभागी होणे.
2. देहांत शासनाला, देश त्यागाला संमती देणे
3. आपल्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन मालमत्ता जप्त होऊ देण्यास तयार होणे.
या स्थितीत पहिला आणि तिसरा पर्याय असह्य होता म्हणून त्यांना दुसरा निर्णय घेणे योग्य वाटले.
परंतू सेनापती म्हणाला " जरी देशत्यागाची शिक्षा स्वच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कोशलाधीपतीस समजणार व तो या निष्कर्ष काढील की ही शिक्षा संघानेचं दिली आहे आणि तो यासाठी संघाला जाब विचारील."
यावर सिद्धार्थ गौतमांनी 'परिव्रज्या' म्हणजेच 'संन्यासाचा' मार्ग सुचवला. हा मार्ग स्वीकारणे म्हणजे एक प्रकारचा देशत्यागचं आहे हे सेनापती ला पटवून दिले, व सेनापती ने ते मान्य केले.
अशा प्रकारे परिव्रज्या' म्हणजेच 'संन्यासाचा मार्ग स्वीकारून भगवान गौतम बुद्ध यांनी आपली पत्नी, मुलगा, आई-वडील व कपिलवस्तू सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
घरी येऊन सर्वांच्या प्रश्नांचे समाधान पूर्वक उत्तर दिली. तुमचा निर्णय योग्य आहे असं सांगून त्यांच्या पत्नीने त्यांच समर्थन करून त्यांना या मार्गासाठी अनुमती दिली. आई, वडील व पत्नीची अनुमती घेऊन सिद्धार्थ गौतम कपिलवस्तू सोडून निघून गेले.
याचं गोष्टीचा परिणाम असा झाला की " कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध अनेक जण उभे राहिले व शाक्य संघाला पुन्हा: सभा बोलवावि लागली, व शांततेचा मार्ग निवडून युद्ध टळले.
या प्रसंगावरून लक्षात येत की त्यांचा निर्णय कुटुंबाच्या, समाजाच्या, कोलियांच्या तसेच सर्वांच्या हिताचा होता.ते मोठया, उदात्त हेतूने राजवाड्याबाहेर पडले. हा गृहत्याग म्हणजे कौटुंबिक जबाबदारी झटकून संन्यासाश्रमाचा स्वीकार नव्हता, तर मानवी समूहाचे दुःख नष्ट करून त्यांना आनंद देण्यासाठीच्या कारणांची मीमांसा आणि त्यावरील उपाययोजना यासाठी होता. त्यांनी केलेला त्याग आमूलाग्र क्रांतीसाठी होता.
पुढे जाऊन त्यांना ज्ञान प्राप्ती होऊन ते सिद्धार्थ गौतम चे गौतम बुद्ध झाले आहेत.
काही चुकलं असल्यास क्षमस्व !!
संदर्भ :-
1. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2. गौतम बुद्धांचे चरित्र - कृष्णराव अर्जून केळुसकर
धन्यवाद 🙏
Comments
Post a Comment