संतांनी_सोपं_केलं_म्हणून_अवघड_झालं
#संतांनी_सोपं_केलं_म्हणून_अवघड_झालं ? :
धार्मिक सरंजामदारी वाढलेली असताना देव आणि सामान्य मनुष्यांमधील मध्यस्थांचे अवडंबर नाकारून देवाशी थेट संवाद साधण्यासाठी नामसंकीर्तनाइतका सहज सोपा उपाय सांगणारी दक्षिण भारतात उगम पावलेली ‘भक्तीपरंपरा’ महाराष्ट्रात येऊन, रूजून, रूळून, स्थिर होऊन आता जवळपास आठशे वर्षे झाली. वयाने आणि बहुभाषक वाङ्मयाने ज्येष्ठ-श्रेष्ठ संत नामदेव ते निळोबा अशी वैष्णव संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या परंपरेमुळे इतर सर्व अब्राह्मणांना आणि स्त्रियांना देवाचे नामस्मरण करण्यासाठी संस्कृत भाषा अवगत असण्याची किंवा धार्मिक ग्रंथ वाचण्याची गरज नव्हती. या परंपरेत तत्कालिन समाजातील उपेक्षित ठेवलेले कांही ब्राह्मण जसे होते, तसेच सर्व स्तरातील, वर्णातील स्त्रिया, सवर्ण, अवर्ण आणि मुसलमान संत सुद्धा होते. गुरू करावा आणि नामस्मरण करून पुण्य पदरात पाडून घ्यावे; इतकी ही सोपी भक्तीपरंपरा होती. अशा सुलभमार्गी भक्तीपरंपरेतील जनांनाही तत्कालीन धर्मलंडांनी छळल्याची उदाहरणे आहेत. त्यातूनही हा संप्रदाय वाढत गेला.
मूळ दक्षिणी परंपरेत गायन असल्याने ती परंपरा इकडेही आली. गाण्यासाठी शब्दांची गरज आणि त्यातून ओव्या आणि अभंग असा विकास होत गेला. शब्दांची आणि अक्षरांची ओळख असणारे लिहिते झाले. त्यातून कुणाची ओळख संत अशी झाली. लिहिणार्यांच्या आकलनानुसार, जगण्याच्या परिघानुसार, अनुभवानुसार, वाचलेल्या आणि ऐकलेल्या धार्मिक साहित्याच्या आकलनानुसार त्यांच्या लेखनात तत्कालिन समाज, ढोंगबाजी, सामाजिक व्यवस्था यांचे चित्रण होत गेले. महत्त्वाचे म्हणजे या लेखनातून देवाच्या स्तुतीबरोबर, त्याच्या आळवणी बरोबरच हिंदू धर्मात कुठेही न आढळणारी समता, मानवता, बंधुभाव, कनवाळूपणा यांचे निदान उल्लेख तरी येऊ लागले. संतांच्या या रचनांमधून कर्मकांडांवर जसा रोष व्यक्त होतो त्याच पातळीवर वर्णव्यवस्थेला, आणि जातीव्यवस्थेला विरोध केल्याचे आढळत नाही हे विशेष. मराठीतील संतसाहित्य असे परस्परविरोधी विचारांनी 'परिप्लुत' आहे. संतांबद्दल पूर्णआदर बाळगून म्हणता येते की, त्यांनी मांडलेले विचार तत्कालिन सामाजिक परिस्थितीत वेगळे आणि योग्य असतीलही. पण वर्तमान काळाशी सुसंगत आहेत असं वाटत नाही. तरीही संत सहित्याच्या ‘गाढ्या अभ्यासकांमध्ये’ संत सहित्याची भलामण करण्याची अहमहमिका लागलेली दिसते . संत साहित्यातीतील कित्येक विचार, मतं, आचार, सोपस्कार आजच्या काळाशी सुसंगत तर नाहीतच. इतकेच नव्हे तर त्यांचे वहन करणार्या ज्या जाती आहेत त्यांच्या विरोधी हे विचार आहेत याची त्यांना जाणीव करून देण्याचे कर्तव्य संत साहित्याच्या अभ्यासकांचे आहे, असे या जणत्यांना का गरजेचे वाटत नाही? उलट संतांनी भागवत धर्मातील कर्मठपणा सामान्य अनुयायांना सोपा करून सांगितला म्हणून खेड्यापाड्यातील जातीयता आणि विषमता आजही टिकून आहे, असा निष्कर्ष काढने वावगे ठरणार नाही . संतांनी सांगितलेला मानवतेचा धर्म हा फक्त अभंगांपुरता मर्यादित असून त्याचे वास्तविक जीवनाशी कसलेही देणेघेणे नसल्याने सामाजिक विषमता आजही टिकून आहे. गेल्या आठशे वर्षांपासूनच्या संतांच्या शिकवणीतून सांगितलेली मानवतेची सूत्रे रुजली असतील तर ती प्रकटपणे का दिसत नाहीत?
पाईकांकडून आणि अभ्यासकांकडून संत साहित्याचा, परंपरांचा अभिमान बाळगावा यांसारखे विचार आणि मार्गदर्शन समाजाला वारंवार केले जाते. बहुतेक संतांनी ‘मांग’ या जातीचा उल्लेख हीन रूपात केलेला आहे, तर अशा विचारांचा अभिमान मांगांनी कशासाठी बाळगावा? हे असले ओझे त्यांनी डोक्यावर घेऊन का मिरवावे? तरीही मांगांनी हे ओझं वाहून न्यावे, असे वाटणारे किती कोडगे असतील!
मराठी संत साहित्यातील जातींची प्रातिनिधीक उदाहरणं घेतली; तर त्यातून सामाजिक व्यवस्था आणि विचारप्रणाली सुस्पष्ट होते. गावोगावच्या ज्या जातींचा आणि स्त्रियांचा नकारात्मक उल्लेख संत साहित्यामधून आढळतो; त्याच स्त्रिया आणि जाती संतांच्या पाठिराख्या आणि त्यांना भजणार्या आहेत. आणि अस्पृश्य जातींतील लोकांना गावांतील मंदिरांमध्ये प्रवेश करायला हरकत घेणाऱ्या आहेत; हा भाबडेपणा म्हणायचा, वैचारिक गोंधळ, की अंधश्रद्धा ?
एकूणच समग्र मराठी संत साहित्यात ज्या-ज्या जातींचे उल्लेख येतात; अर्थातच वाईट किंवा अमंगळाची प्रतिके म्हणून. त्यात उल्लेख असणार्या जाती, जातीसमूह आणि कार्मिकसमूह येणेप्रमाणेे :- मांग, चांडाळ, महार, चांभार आणि ढोर या जातींचे दाखले वारंवार येतात. इतर जातींचे उल्लेख प्रसंगपरत्वे येतात. त्यात कोळी, पारधी, खाटीक, कसाई, कसाब, डोंब, भिल्ल, नावाडी, तेली, पांगुळ, लोहार, माळी, वारीक, कुणबी, कुणबट, कुळवाडी, ढीवर, म्लेंच्छ, कोल्हाटी, अंत्यज (महार जातीचे उल्लेख-तराळ, काठीकर, येसकर, पाडेवार, वेसकर) रजक, परीट, किरात, शूद्र, गणिका, कुंटिणी, जारिणी, कैकाडी, भोपी, शिंपी, हाटकर, कोष्टी, सोनार, गुरव, शुचि, जंगम, कंजार, पिंगळा, यवन, फकीर, फिरंगी, धेड, वाणी, भांड, होलार, इत्यादी.
आजही संत साहित्याची पाठराखण करणारा आणि त्यास डोक्यावरून वाहून नेणारा समाज तोच आहे; ज्यांची वर्णनं संतसाहित्यात त्यास अनुकूल नाहीत. तो ज्याच्या भजनी लागलाय; त्याला त्याचे परीक्षण सोडा; निदान आकलन करण्याची जाणीव आजवर कुणी करून दिलेली नाही. कालबाह्य परंपरांचे आणि विचारांचे जू उतरून ठेवण्याबद्दल त्यांना सांगण्याची हीच वेळ आहे. लोकशाही आपण स्वीकारून अर्धशतक उलटून गेलंय. पण वैचारिक, धार्मिक गुलामगिरीतून मानसिक पातळीवर अडकून पडलेल्यांना वास्तवाची जाणीव करून देण्याच्या महत्त्वाच्या कामाची सुरूवात व्हायला हवी. शिस्त लष्कराला आवश्यक असते; सामान्य नागरिकांना नव्हे !
#संपादित_रिपोस्ट ( Shahu Patole sir यांची पोस्ट )
Comments
Post a Comment